शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि नाशिक शहरमधील महत्त्वाचा चेहरा असलेले सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी, नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आपण शहरातील समस्यांबाबत फडणवीसांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले. या अनपेक्षित भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर बडगुजर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. आता या चर्चा खऱ्या होताना दिसत आहे.
advertisement
होय, मी नाराज... बडगुजरांचे मनातलं ओठांवर आलं....
आज माध्यमांशी बोलताना बडगुजर यांनी मनातील खदखद व्यक्त केली. बडगुजर यांनी म्हटले की, "हो, मी पक्षात नाराज आहे. पण मीच नाही, तर आमच्यासारखे 10 ते 12 जण सध्या नाराजी व्यक्त करत आहेत." त्यांनी ही नाराजी वैयक्तिक नसून, पक्ष संघटनेत झालेल्या बदलांबाबत असल्याचे सांगितले. पक्ष संघटनेत जेव्हा बदल झाले, तेव्हा आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळेच ही नाराजी आहे," असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊतांवर रोख?
संजय राऊत यांच्यावरील नाराजीच्या चर्चांना त्यांनी साफ नकार दिला. "संजय राऊत आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविरोधात कोणतीही नाराजी नाही. आमची नाराजी ही कार्यपद्धती आणि संघटनात्मक बदलांबाबत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि मला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आमचा अपेक्षाभंग झाल्याचे त्यांनी म्हटले.