मनोहर जोशी हे शिवसेनेचे कडवट शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या एका आदेशावर मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असणाऱ्या मनोहर जोशींची वयाच्या ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली होती.
advertisement
दरम्यान, २०१३च्या शिवसेना दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीमुळे मनोहर जोशींना निघून जावं लागलं होतं. सभेवेळी घोषणाबाजी सुरू होताच तिथे उद्धव ठाकरेंनी ही घोषणाबाजी थांबवण्याचाही प्रयत्न केला नव्हता. तेव्हा शिवसैनिकांना नमस्कार करून मनोहर जोशी व्यासपीठावरून निघून गेले होते. त्यामुळे मनोहर जोशी हे ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या.
शिवसेनेत फुटीनंतर याच नाराजीमुळे ते शिंदेंसोबत जातील असं म्हटलं जात होतं. पण मनोहर जोशींनी २०२२ मध्ये शिंदे गटात फूट पडल्यानंतर म्हटलं होतं की, माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र आणि शिवसेनेसाठी आहे. मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा आहे असं सांगत त्यांनी शिंदेंसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.