शिवसेना शिंदे गटाचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) जमिनीवर अतिक्रमण आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. विशेष न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) हे आदेश दिले आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
कुर्ला येथील रहिवासी असणारे रमेश बोरवा यांनी आमदार कुडाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी कुडाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तीनवेळा आमदार राहिलेल्या कुडाळकर यांनी कुर्ला येथे म्हाडाने सेवासुविधा आणि बागेसाठी आरक्षित केलेल्या भूखंडावर एक सभागृह आणि अनेक व्यावसायिक आस्थापने अनधिकृतपणे बांधली, असा आरोप तक्रारदाराने केला होता.
तसेच बोरवा यांनी केलेल्या आरोपांबाबत काही कागदपत्रे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर केली होती. त्याची दखल घेऊन कुडाळकर यांच्यावरील आरोप सकृतदर्शनी गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कुडाळकर यांनी मतदारसंघात विकासकामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केला. तसेच त्यांनी म्हाडाने आरक्षित केलेल्या भूखंडावर सभागृह आणि व्यावसायिक संकुले बांधली, या आरोपांत तथ्य असावं, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यानंतर कोर्टाने एलसीबीला गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
