सोलापूर शहर मध्यचे माकपचे उमेदवार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस आडम मास्तर हे घरात नव्हते, त्यावेळेस ही दगडफेकीची घटना घडली आहे. ही दगडफेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आता आडम मास्तर यांनी केला आहे.
आडम मास्तर हे सोमवारी सायंकाळी 5 वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर काही युवकांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी भ्रमणध्वनीवरून अँड. अनिल वासम यांना या घटनेची माहिती दिली होती.त्यानंतर वासम यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी काही पोलिसांना घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळेस घटनास्थळी काही युवकांचा गोंधळ सूरू होता. वासम आणि अन्य काही जणांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी आता काही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असी माहिती आडम यांनी दिली आहे.
advertisement
दगडफेक करीत गोंधळ घालणारे कार्यकर्ते हे विरोधक असावेत. दारू पिऊन गोंधळ घालणे, विटांनी मारणे असे प्रकार सूरू होते. त्यांना रोखत असताना अॅड. अनिल वासम यांनाही धक्काबुक्की झाली. भविष्यात माझ्यावरही प्राणघातक हल्ला होऊ शकतो. याचा विचार करून ताब्यातील युवकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मी पोलिस आयुक्तांना विनंती करतो, असे नरसय्या आडम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात भाजपकडून देवेंद्र कोठे, काँग्रेसकडून चेतन नरोटे आणि माकपने नरसय्या आडम असे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
