बोला बोला भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिध्देश्वर महाराज कि जय असा गजर आजपासून सोलापुरात घुमणार असून संपूर्ण राज्याला आकर्षण असलेल्या सोलापुरच्या सिध्दरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याला आज सुरुवात झाली. सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या शहरातील 68 लिंगांना तैलाभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सुमारे 900 वर्षांपासून ही यात्रा रूढी आणि परंपरेनुसार अखंडपणे चालू आहे. मानाच्या सात नंदीध्वजांचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. श्री सिध्देश्वर यात्रेसाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक जमतात. सिद्धेश्वर महाराजांनी यात्रेच्या माध्यमातून समतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे. विजापूर नाका येथे मुस्लीम समुदायाकडून फुलांची पुष्पवृष्टी करून स्वागत केले गेले. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला गड्डा यात्रा म्हणूनही ओळखले जाते.
advertisement
रविवार, 14 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून नंदीध्वज मिरवणुकीने सिध्देश्वर मंदिराकडे मार्गस्थ होतील. सिद्धेश्वर महाराज यांच्या योगदंडाशी कुंभार कन्या विवाह होत असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. नंदीध्वज सम्मती कट्ट्यावर आल्यानंतर दुपारी साडेबारापर्यंत सुगडी पूजन, अन्य धार्मिक विधी होऊन नंदीध्वजांचा अक्षता सोहळा पार पडेल. त्यानंतर नंदीध्वज पारंपरिक मार्गाने 68 लिंगांना प्रदक्षिणा करून हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी परततील. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मकर संक्रांतीची पूजा कशी करावी? पूजेचे साहित्य, सूर्यपूजनाची योग्य पद्धत, मंत्र
सोमवार, 15 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हिरेहब्बू यांच्या निवासस्थानापासून मानाचे सातही नंदीध्वज होमप्रदीपन सोहळ्यासाठी मार्गस्थ होतील. जुनी फौजदार चावडीजवळील पसारे यांच्या घराजवळ श्री सिध्देश्वर देवस्थानच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधण्यात येईल. अन्य नंदीध्वजांना विद्युत रोषणाई केल्यानंतर मिरवणूक पुढे जाईल. रात्री नऊ वाजता मिरवणूक होम मैदानावरील होमकुंडाजवळ आल्यानंतर प्रतीकात्मक कुंभार कन्येच्या अग्निप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर नंदीध्वज भगिनी समाजाजवळ आल्यानंतर देशमुख यांच्या घरातून आलेल्या वासराची भाकणूक होईल. वर्षभरात होणाऱ्या घडामोडींची भाकणूक सांगितली जाते. त्यामध्ये पाऊस पडणार की नाही याबाबतीतही भाकणूक वर्तवली जाते.
मंगळवार, 16 जानेवारी होम मैदानावर शोभेच्या फटाक्यांची आतिशबाजी व लेजर शोचे नियोजन करण्यात येत असते. लेजर शोच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वरांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला जातो. कार्यक्रमानिमित्ताने मिरवणुकीने नंदीध्वज होम मैदानावर आणले जातात.
शनिवारी या शनि मंत्रांचा जप लाभदायी! कर्मफळ दाता करेल मनोकामना पूर्ण
बुधवार 17 जानेवारी रोजी उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मानाच्या नंदीध्वजाचे आगमन होते. सिद्धेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर नंदी ध्वजाचे वस्त्र विसर्जनाने व प्रसादा वाटपाने यात्रेतील कार्यक्रमांची सांगता केली जाते. धार्मिक कार्यक्रमानंतर सोलापूरची गड्डा यात्रा पंधरा दिवस सुरू असते.
गेल्या 900 वर्षापासून परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. सोलापुरातील सामाजिक ऐक्यासाठी सिद्धेश्वर यात्रा ओळखली जाते. सिद्धेश्वर यात्रेसाठी सोलापूरच्या इतर भागातून सिद्धेश्वर भक्त दाखल होत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानकडून सर्व तयारी करण्यात येत असते.
