पश्चिम महाराष्ट्रातील सहकार धुरीण, एकेकाळचे काँग्रेस पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर पक्षबदलाचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या नेतृत्वाने उमेदवारीचा शब्द देऊनही तो न पाळल्याने नाराज हर्षवर्धन पाटील यांनी आपली वाट वाकडी करून शरद पवार यांची तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी त्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. शुक्रवारी ते इंदापुरात अधिकृत निर्णय जाहीर करतील. त्यांच्या समर्थकांनी तुतारी फुंकून, फटाके वाजवून पक्षबदलाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
advertisement
वडिलांचा सिल्वर ओकवर निर्णय, भावा बहिणीने स्टेटस बदललं, इंदापुरात तुतारी वाजणार!
यावरच बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, विशिष्ट वयामध्ये आपण पक्षात आलो, तेथे आपणाला प्रेम मिळाले. त्या पक्षासोबत आपण उर्वरित आयुष्यभर राहिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. हर्षवर्धन पाटील चालले आहेत त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करावी असा माझा स्वभाव नाही. एका पक्षात राहण्याचे मानसिक समाधान वेगळे असते आणि लोकांमध्ये देखील प्रतिमा चांगली राहते. समाजाला आणि जगाला काय मिळणार यापेक्षा मला काय मिळणार असे विचार करणारे जरा जास्त झालेत.
समरजीत घाडगे किंवा हर्षवर्धन पाटील यांच्यावर मी टीका करत नाहीये पण हे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. 2014 मध्ये त्यांना फडणवीसांकडून मिळेल अशी अपेक्षा होती म्हणून ते भाजपमध्ये आले पण आता त्यांना असा आभास होतो की पवारांकडून मिळेल. संधीसाधूपणाची सुरुवात आत्तापासूनची नाही तर 1978 ते 80 च्या दरम्यान झाली आहे. 1980 साली सत्ता परिवर्तन करण्यासाठी आणि स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी याची सुरुवात झाली, अशा शब्दात शरद पवार यांचे नाव न घेता चंद्रकांतदादांनी निशाणा साधला.
अलीकडच्या काळामध्ये अशाप्रकारे एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये उड्या मारण्याचे प्रमाण वाढले आहे. राजकारणामध्ये जो जो येतो त्याला सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते. संयम नसल्यामुळे जी निवडणूक येईल त्यात मला संधी द्या, यात मला संधी द्या असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे पण तिकीट जाहीर झाल्यानंतर सगळे पुन्हा भानावर येतात, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.