सोलापूर : सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. त्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. किरकोळ बाजारात सध्या लसूणचा दर थेट 400 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहे. येणाऱ्या पुढील सणासुदीच्या काळात हा भाव आणखी वाढून 600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
लसणाच्या भावा संदर्भात सोलापूर शहरातील रेल्वे लाईन भाजी मार्केट येथील लसुण विक्रेता शहाहुजुर शेख यांनी अधिक माहिती दिली. लसणाला आहारात महत्त्व आहे. मात्र, यंदा लसणाची आवक कमी झाल्याची माहिती लसणाचे व्यापारी शेख यांनी दिली.
advertisement
जुन्या लसणाची आवक जवळपास संपली आणि नवीन लसूण उपलब्ध नसल्याने सध्या बाजारात लसणाचे दर प्रचंड वाढले आहेत. यावर्षी देशातील लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. आधीच महागाईने सर्वसामान्य नागरिक काटकसर करून आयुष्य जगत आहेत. महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी एवढा महागडा लसूण विकत घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न गृहिणी उपस्थित करत आहे.
दरम्यान, यापूर्वी जानेवारी महिन्यातही लसणाच्या दरांचा मोठा भडका उडाला होता. वाढलेला भाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा ऑगस्टमध्ये भाव वाढले आहेत. बाजारात सध्या लसूण 400 रुपयांनी किरकोळ बाजारात विकला जात आहे. तर घाऊक बाजारात लसणाचा दर कमाल 320 रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथून लसणाची आवक होत असते. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये नवीन लसूणचे उत्पादन होते. त्यानंतर आवक फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होते. त्यामुळे या वर्षी तरी नागरिकांना महागडाच लसूण खावा लागणार असल्याची शक्यता आहे. लसूण महागल्यावर आता पुन्हा दर किती दिवसांपर्यंत कमी होतील, असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत याहे. तसेच सामान्य नागरिकांकडून यावर संताप व्यक्त केला जात आहे.