सोलापूर स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीयदृष्ट्या जागृत शहर म्हणून ओळखलं जात होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1930 साली देशवासीयांना सविनय कायदेभंगाची हाक दिली. या हाकेला सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला. सोलापूर शहर 9, 10, 11 आणि 12 मे असं चार दिवस इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र होतं. सोलापूरच्या नगरपरिषदेवर चार दिवस तिरंगा ध्वज फडकत होता.
advertisement
सोलापूरमधील हा लढा दडपून काढण्यासाठी ब्रिटिशांनी शहरात मार्शल लॉची घोषणा केली आणि या चळवळीतील तरुण क्रांतिकारी कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले. ब्रिटिश सरकारने या चौघांवर मंगळवार पेठेतील पोलीस चौकी जळीत प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप लावला. 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी पुणे येथील येरवडा कारागृहात या चार क्रांतिवीरांना फासावर लटकवले.
900 वर्षांत पहिल्यांदाच झाली नाही यात्रा
सोलापूर शहरांमध्ये जानेवारी महिन्यात श्री ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांची गड्डा यात्रा असते. या यात्रेच्या वेळेस वेगवेगळ्या भागातील भाविक शहरात येत असतात. या सर्वांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून ब्रिटिशांनी 12 जानेवारी रोजी या चार क्रांतिवीरांना फाशी दिली. या फाशीनंतर 900 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गड्डा यात्रा झाली नव्हती. संपूर्ण सोलापूरमध्ये शोकाकुल वातावरण होते, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांनी दिली.