सध्या पावसाळा हा ऋतू सुरू असून वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही ठिकाणी वातावरणात कमालीचा दमटपणा जाणवत आहे. त्यामुळे सोलापुरातील जनावरांना मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराची लागण झाली आहे. प्रामुख्याने देशी गायी आणि म्हशी या आजाराला बळी पडत आहेत.
लम्पी आजाराची लक्षणे
जनावरांना ताप येणे, हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय दूधामध्ये घट होणे, जनावरांचे पाय, खांदे आणि मानेवरती 10 ते 50 मिली मीटरच्या गाठी येणे, डोळ्यांतून पाणी वाहणे, ही देखील आजाराची लक्षणं आहेत. लम्पीची लागण झाल्यास जनावरांचा आहार देखील कमी होतो. हा एक विषाणूजन्य आजार असून त्यावरती ठोस उपाय नाही.
advertisement
Cattle Care: शेतकरी दादा! पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला धोका, अशी घ्या काळजी!
प्रतिबंधात्मक उपाय
आपल्या जनावरांना हा आजार होऊ नये म्हणून जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. जर एखाद्या जनावराला लम्पीची लागण झाली तर त्याला इतर निरोगी जनावरापासून लांब बांधावे. जनावरांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून निरोगी जनावरांना हा आजार होणार नाही. गायी आणि म्हशींना हा आजार होऊ नये म्हणून पशुपालकांनी गोठ्याची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
मेटॅरायझियम (Metarhizium) या औषधाची 5 ग्रॅम पावडर एक लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली तर गोठ्यामध्ये डास आणि माशांचे प्रमाण कमी होते. संध्याकाळच्या वेळी गोठ्याजवळ कडूलिंबाच्या पाल्याचा धूर केल्यास कीटक जनावरांपासून दूर राहतात. जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली तर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील अभ्यासक डॉ.तानाजी वळकुंडे यांनी केले आहे.