सोलापूर : साप म्हटलं की, धडकीच भरते मग तो लहान असो किंवा मोठा असो त्याची भीती वाटतेच. परंतु सापांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मनासारखं वावरता यावं, त्यांची संख्या कमी होऊ नये, त्यांच्यापासून कोणाला इजा होऊ नये यासाठी सर्पमित्र स्वत:चा जीव धोक्यात घालून सापांना पकडतात आणि सुखरूप जंगलात सोडतात. एका सर्पमित्रानं तर तब्बल 15 हजार सापांना वाचवलंय. हा आकडा वाचूनच अंगावर काटा येतो. म्हणूनच या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.
advertisement
सर्पमित्र भीमसेन मनोहर लोकरे यांनी 15 हजार साप पकडल्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं हे कार्य नोंदविण्यात आलंय. तसंच पर्यावरण क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाबद्दल इंडिया प्राऊड बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.
भीमसेन मनोहर लोकरे हे सोलापुमधील विजापूर नाका इथले रहिवासी, ते गेल्या 15 वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करतात. राजधानी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लब संसद मार्ग इथं पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आलं. दरवर्षी देशातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. भीमसेन लोकरे हे पर्यावरण क्षेत्रातून इंडिया प्राऊड ऑफ रेकॉर्डचे महाराष्ट्रातील एकमेव मानकरी ठरले.
भीमसेन लोकरे सांगतात, नागरिकांना एकदा विषारी साप ओळखता आले की, बिनविषारी सापाला पकडून ते नैसर्गिक अधिवासात सोडू शकतात. आता तरी नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाल्यानं बहुतांशी लोक घराच्या परिसरात साप आढळल्यास त्याला न मारता नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. नाहीतर साप दिसल्यास किंवा घरात आढळल्यास तात्काळ वनविभागाशी किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, सोलापूर परिसरात विषारी सापांच्या तुलनेत बिनविषारी सापांचा वावर अधिक आढळतो. तर, इथं नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे विषारी साप प्रामुख्यानं आढळतात, अशी माहिती भीमसेन लोकरे यांनी दिली.