ठाणे आणि डोंबिवली परिसरातील भाविक देवदर्शनासाठी क्रूझर गाडीने निघाले होते. अक्कलकोट आणि गाणगापूर येथील दर्शन आटोपल्यानंतर त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले. मात्र, मंगळवेढा मार्गावरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या क्रूझरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरच्या ड्रायव्हर बाजूचा पूर्ण हिस्सा अक्षरशः चिरडला गेला असून गाडीचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
या दुर्दैवी घटनेत एका लहान मुलासह 3 महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतरचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता, जिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले भाविक आणि जखमींचा आक्रोश पाहून मदतीला धावलेल्या लोकांचेही डोळे पाणावले. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
सध्या 8 भाविक मृत्यूशी झुंज देत असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. मृत भाविक हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी असल्याने त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमींमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून 5 ते 6 जणांची प्रकृती अजूनही अत्यंत नाजूक आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ठाण्यात मोठी खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. देवदर्शनाच्या समाधानाचे रूपांतर क्षणात मृत्यूच्या छायेत होईल, अशी कोणाही कल्पना केली नव्हती.
