सोलापूर : भारतात अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांचे आपले एक महत्त्व आहेत. त्यात तुम्ही अनेक जुने महादेवाची मंदिरेही पाहिले असतील. अनेक शिवपिंडीही पाहिल्या असतील. मात्र, तुम्ही 359 मुखी शिवलिंग बघितले नसेल.
सोलापूर ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या संगमेश्वर आणि श्री हरीहरेश्वर मंदिर परिसरात या शिवलिंगांचे नक्कीच दर्शन होईल. हे ठिकाण भीमा-सीना या नद्यांच्या संगमावर आहे. यामुळे या ठिकाणाला कुडल अर्थातच संगम असे म्हटले जाते. येथील बहूमुखी शिवलिंगाबाबत स्थानिक रहिवासी मल्लिकार्जुन यमदे यांनी अधिक माहिती दिली.
advertisement
चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार, नवीन गाड्याही दाखल होणार, नेमका काय बदल होणार?
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्य शिवलिंगावर महादेवाच्या अनेक रुपांमधील शिल्प कोरण्यात आले आहेत. साधारणपणे मुख्य शिवलिंग धरून 360 शिवलिंगे यावर कोरण्यात आलेली आहेत. एक हजार वर्ष जुने असलेल्या हरिहरश्वर मंदिराचे उत्खनन करताना हे बहुमुखी शिवलिंग सापडल्याचा ग्रामस्थ अंदाज व्यक्त करतात.
या शिवलिंगाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यातील प्रत्येक मुख हे दोन मुखांच्या अगदी मधोमध कोरलेले आहे. मुख्य शिवलिंगावर जर दुग्धाभिषेक केला तर तो शिवलिंगावर कोरलेल्या अन्य 359 शिवांच्या जटांवर पडावा, अशी धारणा शिल्प कोरणार्या कलाकाराची असावी, अशीही भावना आज व्यक्त केली जात आहे.
महाशिवरात्री तसेच श्रावण महिना आणि मकर संक्रांतीमध्ये हत्तरसंग कुडल येथे यात्रा भरते. त्यावेळी अनेक धार्मिक विधी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमांचे श्री संगमेश्वर मंदिर परिसर सुधारणा समितीद्वारे आयोजन केले जाते.
सूर्य जेव्हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यावेळी हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वर मंदिरातील शिवलिंगावर पहाटेची सूर्यकिरणे पडतात. महाराष्ट्रात फार थोड्या ठिकाणी असा किरणोत्सव पाहावयास मिळतो. याचे दर्शन घेण्यासाठी भाविक व पर्यटक हत्तरसंग कुडल यथे येतात.