दोन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयातून एका महिलेकडून तीन दिवसाच्या नवजात बाळाची चोरीचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून महिलेनं बाळाला चोरलं होतं. त्यामुळे चोरीला गेलेल्या बाळाला शोधण्याचा एक मोठं आव्हान सांगली पोलीस दलासमोर होतं. अखेर पोलिसांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न करत अवघ्या 48 तासात चोरीला गेलेल्या बाळाचा शोध लावला. त्या बाळाला सुखरूपपणे तिच्या आईच्या स्वाधीन केलं आहे.
advertisement
बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक
तर बाळ चोरणाऱ्या सारा साठे या महिलेला तिच्या पतीसह तासगावच्या सावळज येथून सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बाळाला सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर बाळाला स्वतः सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी आपल्या पोलीस दलासह मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन बाळ सुखरूपपणे तिच्या आईकडे स्वाधीन केलं. या महिलेनं बाळ का चोरलं हे अद्याप समजू शकलं नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
