उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केला. मात्र, यावेळी बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केलं आहे. झिरवळ यांच्या वक्तव्यानंतर राज्यात राजकरणात नव्या हालचालींना वेग आला आहे.
advertisement
नरहरी झिरवळ काय म्हणाले?
नरहरी झिरवळ माध्यमांशी बोलताना म्हणाले, अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने तातडीने निर्णय घ्यावा... आता तुतारी आणि घड्याळ वेगळं नाही दोन्ही एकच आहे. आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत, यापुढे देखील त्या एकत्र राहतील.
उपमुख्यमंत्रीपदासाठी नेमका कोणता चेहरा पुढे येणार?
अजित पवारांना मुखाग्नी दिल्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा या सर्व घटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत संकेत दिले आहेत. पक्षात नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, उपमुख्यमंत्रीपदासाठी नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भावपूर्ण वातावरणात अजित दादांना निरोप
अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते, सामन्य नागरिकांसह महिलांनी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली होती. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावर मोठा जनसमुदाय उसळला होता. अजित दादा परत या अशी आर्त हाक सगळ्यांकडून दिली जात होती. आपल्या दादा आता यापुढे कधीच दिसणार नाही या भावनेनं अनेकांनी टाहो फोडला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात अजित दादांना निरोप देण्यात आला.
