शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनिल तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुनिल तटकरे यांनी एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान बोलताना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना पंचाचा निर्णय अंतिम असतो, असे म्हटले होते. त्यानंतर आता महेंद्र थोरवे यांनी देखील त्यावर पलटवार केला आहे.
महेंद्र थोरवे काय म्हणाले?
शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले की, पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कॅप्टन होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे (Cricekt) उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे थोरवेंनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे. मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती दिली आहे. कर्णधाराने सर्व सहकाऱ्यांना सामावून घेतले पाहिजे.आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात, याची आठवणही थोरवे यांनी करून दिली.
advertisement
औरंगजेब सुतारवाडीत राहतोय...
महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात सुनिल तटकरेंना औरंगजेबची उपमा दिली. त्यांनी म्हटले की, आजचा औरंगजेब हा सुतारवाडी बसला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण कराल तर लक्षात ठेवा. कर्जत विधानसभा लढलोय. भरतशेठ यांनी आशिर्वाद दिला तर पुढील लोकसभा रायगडमधून लढवण्याची तयारी ठेवू असेही थोरवे यांनी म्हटले.
