फलटण उपजिल्हा रुग्णालयातील युवती डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. युवती डॉक्टरने लिहिलेल्या एका पत्रात माजी खासदाराच्या स्वीय सहाय्यक हा अहवाल बदण्यासाठी वारंवार फोन करायचा, असा गंभीर आरोप केला. त्यावरून विरोधी पक्षाने नाईक निंबाळकर यांना लक्ष्य करायला सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटणमध्ये जाऊन त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत थेट त्यांना क्लिनचिट दिली. यावरून जोरदार राजकारण रंगलेले असताना पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अंधारे यांनी नाईक निंबाळकर यांनी पोलिस यंत्रणेला हाताशी धरून दबाव तंत्राचा वापर करून कसे काम केले, हे मांडण्याचा प्रयत्न केला.
advertisement
ते हॉटेल भाजपच्या संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं
ती डॉक्टर तरुणी हॉटेलवर गेली होती की बोलावले होते? बोलावले असेल तर कशासाठी बोलावले होते? जर तिची बहीण सांगते आहे की तिच्या हातावरचं हस्ताक्षर नाहीये तर मग तिच्या हातावर कुणी लिहिलं? तिची आत्महत्या आहे की हत्या केली गेली? असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले. तसेच डॉक्टर युवतीने आत्महत्या केलेले हॉटेल भाजपच्या संभाव्य नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भोसले नावाच्या गृहस्थाचा असल्याचा आरोप करून ये रिश्ता क्या कहेलाता है याची न्यायालयामार्फत चौकशी समिती गठीत करून तपास व्हावा, अशी मागणी अंधारे यांनी केली.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून मजुरांचा अनेक वेळा छळ, आरोग्य यंत्रणेवर दबाव
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून मजुरांचा अनेक वेळा छळ झालेला आहे. अनेक मजुरांना मारहाण करून त्यांच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी सरकार रुग्णालयावर दबाव आणण्याचे काम नाईक निंबाळकर यांनी केल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
