कालची उद्धव-राज भेट यावरून राजकारण रंगलं. दुसऱ्यांची पोरं किती खेळवणार असे संजय राऊत म्हणाले तर तुमच्या घोषणेचा रंग बदलला, असा प्रतिटोला आशिष शेलार यांनी लगावला. राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
राजकीय वादांना तिलांजली देत ठाकरे कुटुंबीयांमधील कौटुंबीक वीण आता घट्ट होत चाललीय. मनसेच्या दीपोत्सवासाठी सर्व ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. तर शिवाजी पार्कात हिंदुत्वाच्या घोषणा देणाऱ्यांचा रंग विरल्याचा टोला आशिष शेलारांनी लगावला. त्यावरून संजय राऊतांनी शेलारांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपचा रंग भ्रष्टाचाराचा आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली.
advertisement
उद्धव ठाकरेंनी मनसेच्या दीपोत्सवाचं उदघाटन केल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्यांनी एकच जल्लोष केला. कारण ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षात आतापर्यंत पडलेला राजकीय अंधार दीपोत्सवामुळे आता दूर झालाय. ठाकरे कुटुंब दीपोत्सवात आनंदाने सहभागी झालं होतं. ठाकरे कुटुंबातील स्नेह वाढत असल्याचं यातून स्पष्ट झालं. व्यासपीठावरच नव्हे तर घरातही ठाकरे कुटुंबातील जनरेशन नेक्स्टची केमेस्ट्री पाहायला मिळाली. ठाकरे भावंडांनी या निमित्तानं जोरदार फोटोसेशनही करून घेतलं. मात्र निवडणुका जवळ आल्यानं आता ठाकरे काँग्रेस भवनकडे वळाल्याचा टोला भाजपकडून लगावण्यात आला.
आशिष शेलारांनी हिंदुत्वाच्या घोषणांवरून केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं. राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका. भाजप पक्ष भाजपचा राहिला का? सगळे काँग्रेस, राष्ट्रवादीवाले भाजपमध्ये आले, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत आणि आशिष शेलारांमध्ये हिंदुत्वावरून लढाई सुरू झाली. तर मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच कारमधून गेले होते. त्यावेळी कारचं स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती होतं. यावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी टीका करण्याची संधी साधून घेतली. शिवाजी पार्कातील दीपोत्सवात ठाकरेंमधील भावबंध उजळून निघाले. आता हे उजळलेले भावबंध आणि ठाकरेंची एकी दोन्ही पक्षांसाठी कितपत फायद्याची ठरते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.