नेमकी घटना घडली तरी कशी?
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध व्यक्ती तावडे हे रात्री झोपेतून उठून लघुशंकेसाठी गेले होते. मात्र झोपेच्या तंद्रीत त्यांनी चुकून घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि बाहेर आले. त्यांनी घराबाहेरच्या भागात लघुशंका केली आणि पुन्हा घरात जायचा प्रयत्न केला. पण अंधार आणि गुंगीमुळे त्यांनी घराऐवजी थेट लिफ्टच्या दरवाज्याजवळ जाऊन तो उघडला. लिफ्ट तेव्हा वरच्या मजल्यावर असल्याने खाली खोल डक्ट रिकामा होता. दरवाजा उघडताच वृद्ध व्यक्तींचा तोल गेला आणि ते थेट लिफ्टच्या डक्टमध्ये कोसळले.
advertisement
कधी घडली घटना?
हा संपूर्ण प्रकार मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडला. त्या वेळी सर्व कुटुंबीय झोपलेले असल्याने कुणालाच काहीच कळले नाही. सकाळी उठल्यावर वृद्ध व्यक्ती घरात दिसत नसल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळानंतर लिफ्टच्या डक्टमध्ये पाहिले असता ते खाली पडलेले आढळले. तातडीने त्यांना बाहेर काढून शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या वृद्ध व्यक्तीला यांना रक्ताभिसरणाचा त्रास होता, परंतु ते चालते-फिरते होते. झोपेच्या गुंगीमुळे त्यांनी ही चूक केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षेसाठी घरात योग्य व्यवस्था ठेवण्याची गरज असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार तावडे पुढील तपास करत आहेत. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या घटनेने डोंबिवलीत खळबळ माजली आहे.
