फक्त ठाण्यातच नाही, तर कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालवणाऱ्या त्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला आहेत. करीना आडे (वय 49) यांनी 17 मे 2025 पासून ठाणे परिसरात 'पिंक ई-रिक्षा' चालवण्याची सुरुवात केली आहे. त्यांच्या या वाटचालीला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. लोकल18 च्या माध्यमातून त्यांचाच प्रवास जाणून घेऊ.
विदर्भातून मुंबईकडे एका प्रवासाची सुरुवात
advertisement
करीनाचं मूळ गाव विदर्भातील वाशीम जिल्ह्यात आहे. 1992 मध्ये त्या दहावीत नापास झाल्या आणि 1993 मध्ये कामाच्या शोधात मुंबई गाठली. मुंबईत JNPT जवळ एका कँटीनमध्ये काम करत असताना त्यांनी ट्रकचालकांशी ओळख करून घेतली आणि त्यांच्यासोबत छोट्या प्रवासांत मदत करू लागल्या. यातूनच त्यांना गाडी चालवण्याची गोडी लागली आणि हळूहळू ड्रायव्हिंग लायसन्स ही काढले.
Home Business: धपाट्याचा स्टॉल लावला अन् सुचली बिझनेस आयडिया, आता महिलेची कमाई लाखात!
रोजंदारीपासून ई-ऑटोपर्यंतचा प्रवास
कँटीनमधील कामानंतर करीना काही काळ BPO कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी गाडी चालवत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे ते काम बंद झालं आणि पुन्हा बेरोजगारी आली. यावेळी त्यांनी स्वतःची गाडी घेण्याचं ठरवलं. अनेक बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केले, पण ट्रान्सजेंडर असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अखेर ‘सामर्थ्य भारत व्यासपीठ’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एम्पॉवरमेंट योजनेअंतर्गत त्यांना पिंक ई-ऑटो भेट मिळाली. संस्थेचे भाटू सावंत म्हणतात, “त्यांची पार्श्वभूमी तपासून आम्ही त्यांची जिद्द आणि प्रामाणिकपणाचा सन्मान केला.”
शिक्षण अधुरं राहिलं, पण स्वप्न नाही
दहावीत अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. तब्बल 32 वर्षांनंतर, 2025 मध्ये त्यांनी पुन्हा दहावीची लेखी परीक्षा दिली. शिक्षण पूर्ण करण्याची तीव्र इच्छा आणि आत्मसन्मान यातून त्यांनी हा टप्पाही पार केला. यानंतर त्या 12 वी ची परीक्षा देखील देणार आहेत.
कुटुंबाचा आधार नाही, पण जिद्द मजबूत
करीना सांगतात, “मी एक सामान्य मुलगी होते, पण किशोरवयात स्वतःला वेगळं व्यक्त करू लागले. समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावामुळे मला स्वीकारलं गेलं नाही. म्हणून मी घर सोडलं. हातात काहीच नव्हतं, फक्त जिद्द होती.”
दिवसाचे दोन सत्र आणि घरकामाची जबाबदारी
करीना दररोज सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत रिक्षा चालवतात. दिवसाच्या वेळेत त्या आपल्या नातेवाइकांच्या दोन मुलांची देखील काळजी घेतात. "फक्त काही दिवस झाले, पण प्रवाशांचा प्रतिसाद खूपच सकारात्मक आहे. बऱ्याच जणांना माझ्यासोबत सुरक्षित वाटतं आणि ते माझा नंबरही घेतात," असं त्या सांगतात.
पुढचं स्वप्न ट्रॅव्हल एजन्सी आणि TMT बस
ई-ऑटो ही केवळ सुरुवात आहे. करीनाचं मोठं स्वप्न आहे. स्वतःची टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सी सुरू करण्याचं, त्यासोबतच त्या भविष्यात ठाणे महापालिकेची (TMT) बस देखील चालवायची इच्छा बाळगतात.





