उल्हासनगर रेल्वे स्थानकावर बाहेरच्या राज्यातील नागरिकांना तिकीट घेण्यासाठी टोकन सिस्टम सुरू केल्याचा आरोप मनसेने केला. यावेळी रेल्वे स्थानकावर जाऊन मनसेचे पदाधिकारी सचिन कदम यांनी याबाबत जाब विचारला. त्यावेळी मध्यस्थी केलेल्या जवानामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मराठी-हिंदीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंग वरून गोंधळ सुरू असल्याची माहिती समोर आली. त्या अनुषंगाने मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथे गेले होते. त्यावेळी एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून ‘मराठीत बोला’ असं सचिन कदम यांने म्हटले. त्यावर मराठी येत नाही असे मुजोरीच्या स्वरात म्हटले असल्याचे कदम याने सांगितले. यावर तुमची तक्रार डीआरएमकडे करणार असल्याचे सांगताच जा, माझी तक्रार करा असे आव्हानही कदम यांना दिले.
advertisement
मराठी अधिकाऱ्याचाही हिंदीत बोलण्याचा आग्रह...
या वादावादीत मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मराठी भाषिक आरपीएफ अधिकाऱ्यानेदेखील मनसे कार्यकर्त्यांना त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला’, असा अजब सल्ला दिला. त्यावर मनसे नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, या अधिकाऱ्याने मराठीला कधी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असा उलटसवाल केला.
या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.
