चौकीदारच निघाले चोर
ठाण्यातील नौपाड्यामध्ये 12 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एकाच रात्रीमध्ये सलग 14 दुकानांमध्ये चोरी झाली होती. याप्ररणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या चोऱ्यांचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. घटनास्थळी मिळालेल्या 90 ते 100 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलिसांनी केली. तेव्हा चोरी केल्यानंतर चोरटे वेगवेगळ्या मार्गाने निघून गेल्याचे दिसले.
advertisement
फेसबुकवरची यारी, पडली भारी! ऑनलाईन मैत्रिणीनं घातला 82 लाखांना गंडा, कशी झाली फसवणूक?
चोरी करणारे दोघेही नेपाळी
चोरी करणारे दोघे दोन नेपाळी सुरक्षारक्षक आहेत हे निष्पन्न झाले. त्यांची नावे महंत कामी आणि विष्णू कामी अशी आहेत. महंत मीरारोड तर विष्णू उल्हासनगर भागात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. दोघेही दिवसा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे आणि रात्री चोऱ्या करीत होते. विष्णू विरोधात मीरा भाईंदरमध्ये एक गुन्हा यापूर्वी दाखल झाला आहे.
अशी करायचे चोरी
सीसीटीव्ही फुटेजवरून विष्णू आणि महंत यांची चोरी करण्याची पद्धत पुढे आली आहे. महंत हा मार्केट परिसरातील बंद दुकानांचे शटर उचकटून चोरी करायचा. तर विष्णू हा लांब उभा राहून रेकी करीत असल्याचे दिसून आले. या दोघांनीही ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात 9 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. 9 पैकी चार गुन्हे दोघांनी तर उर्वरित पाच हे महंत याने साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे उघड झाले.
27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडील चौकशीत महंत आणि विष्णू या दोघांनाही 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. उपनिरीक्षक दीपक घुगे यांच्या पथकाने या चोरट्यांकडून साहित्य जप्त केले. त्याचबरोबर 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत केला आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.