फेसबुकवरची यारी, पडली भारी! ऑनलाईन मैत्रिणीनं घातला 82 लाखांना गंडा, कशी झाली फसवणूक?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Online Fraud: एका नामांकित कंपनीच्या मॅनेजरची फेसबुकवरून एका महिलेशी मैत्री झाली. या मैत्रीणीने संजय यांना तब्बल 82 लाखांना गंडा घातला.
मुंबई : हल्ली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यात सोशल मीडियाचा वापर करून अनेकांना लुबाडलं जातं. असंच एक प्रकरण ठाण्यात घडलं. जिथे फेसबुकवर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट संजयला तब्बल 82 लाखांना पडली. मुंबईतील एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर असलेले संजय यांना फेसबुकवर एका अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारल्यावर संवाद सुरू झाला. मैत्री झाल्यानंतर महिलेनं संजयचा विश्वास संपादन केला आणि इथंच घात झाला.
नेमकं घडलं काय?
फेसबुकवरच्या मैत्रिणीनं क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असं आमिष दाखवलं. महिलेच्या सांगण्यावर विश्वास ठेवून संजय यांनी क्रिप्टो वॉलेटवर अकाउंट तयार केलं. त्यानंतर तिने त्यांना एका आर्थिक सल्लागाराचा नंबर दिला. त्या व्यक्तीने संजय यांना एक लिंक पाठवली आणि गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन केलं.
advertisement
संजय यांनी 82 लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला गुंतवणुकीवर मोठा नफा मिळाल्याचं ऑनलाईन दाखवलं गेलं. मात्र, जेव्हा संजय यांनी पैसे मागितले, तेव्हा वेगवेगळी कारणं सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं संजय यांना लक्षात आलं. तब्बल 82 लाखांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी तात्काळ कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
advertisement
तुमचीही होऊ शकते फसवणूक
सोशल मीडियावर होणाऱ्या अशा फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट किंवा आर्थिक गुंतवणुकीच्या ऑफरला प्रतिसाद देताना सतर्क राहणं आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी सखोल चौकशी करावी आणि संशयास्पद वाटल्यास त्वरित पोलिसांना कळवावं, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 27, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
फेसबुकवरची यारी, पडली भारी! ऑनलाईन मैत्रिणीनं घातला 82 लाखांना गंडा, कशी झाली फसवणूक?