ठाणे : रोजच्या गडबडीमध्ये आपण अनेक गोष्टी विसरतो. पण ही गोष्ट सोन्याच्या दागिन्यांची बॅग असेल तर आणखी अवघड होऊन बसतं. पण अशीच एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. कल्याण रेल्वे स्थानकावर एका महिलेची 3 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग हरवली होती. मात्र, रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी अगदी अर्ध्या तासाच्या आत ही दागिन्यांची बॅग शोधली.
advertisement
नेमकं काय घडलं -
तपोवन एक्स्प्रेसमधून धनश्री धनवटे या प्रवास करत होत्या. मात्र, कल्याण रेल्वे स्थानकावर त्या आपली तीन लाख रुपयांच्या दागिन्याची बॅग विसरल्या. यानंतर त्या घाबरुन गेल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी त्यांची बॅग शोधून दिली.
डोंबिवलीतील आजडेपाडा इथे बालपण गेलेल्या धनश्री धनवटे यांचा विवाह अहमदनगर येथील मयूर धनवटे यांच्यासोबत झाला आहे. सध्या मयूर धनवटे हे जम्मू येथे आपल्या कर्तव्यावर आहेत. तर धनश्री या अहमदनगरहून डोंबिवलीत माहेरी येत होत्या. त्यासाठी त्या अहमदनगरहून नाशिकला बसने आल्या. त्यानंतर नाशिकवरून साडेसहा वाजता निघणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये बसून रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यानच कल्याण स्थानकात उतरल्या. त्यांच्याजवळ दोन बॅग होत्या. त्यातील एका बॅगेत तीन लाखांचे दागिने होते.
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना होतोय फायदा, शासकीय दंत महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम आहे तरी काय?
धनश्री यांनी कल्याण स्थानकात उतरल्या. नंतर डोंबिवलीला जाण्यासाठी लोकल पकडली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांची एक दागिन्यांची बॅग त्या विसरल्या आहेत. बॅग कुठे विसरल्या, हे सुद्धा धनश्री यांना आठवत नव्हते. आपली बॅग हरवली आहे, हे लक्षात येताच धनश्री यांनी त्यांच्या पतीला कॉल केला. यावर त्यांच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. धनश्री यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस हवालदार विजय माने यांना कल्याणच्या फलाट क्रमांक सहावर काळ्या रंगाची एक अनोळखी बॅग सापडली.
जालन्यातील धक्कादायक वास्तव, महापालिकेची शाळा भरते चक्क मंगल कार्यालयात, एक वर्ग वराच्या खोलील तर...
त्यांनी याबाबतची माहिती फौजदार रोशनी तिरोले यांना फोनद्वारे कळवून त्याचे फोटो त्यांच्या मोबाइलवर पाठवले. यावेळी धनश्री तक्रार देण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांना लगेचच त्यांची हरवलेली दागिन्यांची बॅग परत करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासातच बॅग परत मिळाल्याने धनश्री धनवटे यांनी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलातील अधिकाऱ्यांचे आभार मानले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने धनश्री धनवटे यांची दागिन्यांची बॅग रेल्वे पोलिसांनी शोधून दिली. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा आणि रेल्वे सुरक्षा बलावर सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.