नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. पण आता हा हल्ला बनावट असल्याचं पोलिसांनी तपासात समोर आणलं असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांच्यावर कुणी हल्ला केला, याचा कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी कोर्टामध्ये हा हल्ला खोटा असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ग्रामीण पोलिसांनी क्लोजर समरी कोर्टात सादर केली आहे. ज्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा सापडला नसल्याचे समोर आलं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्या गाडीवर मोठा दगड फेकून जीव घेणा हल्ला झाला होता. त्यात अनिल देशमुख किरकोळ जखमी झाले होते. मात्र, हा अनिल देशमुख यांचा दावा बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेली तक्रार खोटी आणि बनावट असल्याचा पोलिसांचा तपासात निष्कर्ष काढला आहे. कोर्टात बी समरी रिपोर्ट दाखल केला आहे.
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
दिलेली तक्रार तपासात खोटी निघाली तर तक्रारदार अडचणीत येतो. IPC च्या कलम 182 आणि कलम 211 अंतर्गत तक्रारदारावर फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. कोर्टात सादर बी समरी रिपोर्ट याकरिता प्रमाण मानलं जातं. या कलमांनुसार, कायद्याचा गैरवापर केल्याबद्दल शिक्षा होऊ शकते. या खोट्या तक्रारीमुळे जर एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्यास, त्यावर मानहानीचा दावा देखील दाखल केला जाऊ शकतो.
कायदेशीर तरतुदी काय?
IPC कलम 182 - जेव्हा एखादी व्यक्ती कायद्यातील सार्वजनिक नोकर/अधिकारी/जमादार यांना खोटी माहिती देते, ज्यामुळे त्यांना कोणतीही कारवाई करण्यास प्रवृत्त केले जाते आणि त्या माहितीमुळे लोकसेवेला किंवा व्यक्तीला हानी पोहोचते, तेव्हा हे कलम लागू होते
IPC कलम 211 -एखाद्या व्यक्तीला दुखापत करण्याच्या उद्देशाने, जाणूनबुजून खोटी तक्रार दाखल करणे हा गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळल्यास कारावासाची शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकतात.