उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुण्यात होते. हडपसर येथे जनसंवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी दोन दिवस त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी कुर्डू फोन प्रकरण, एकनाथ शिंदे यांची सरकारवर कथित नाराजी, पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्द अशा प्रश्नांवर उत्तरे दिली.
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा फोन प्रकरणावर अजित पवार यांची भूमिका
advertisement
राज्यातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी तुम्ही ज्या भाषेत बोललात ते जनतेला आवडले नाही, असे अजित पवार यांना विचारले असता, कुर्डू प्रकरणावर ट्विट करून मी माझी भूमिका मांडलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या भूमिकेची नोंद घेतलेली आहे. यापेक्षा मला अधिक काही बोलायचे नाही, असे अजित पवार म्हणाले. पत्रकारांनी याच विषयावर अधिक विचारण्याचा प्रयत्न केला मात्र मी माझी भूमिका मांडून झालेली आहे. मी अधिक काही बोलणार नाही, असे सांगत अजित पवार यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे सरकारवर नाराज, अजित पवार म्हणाले, ते नाराज नाहीत हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?
एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यांच्या नाराजीवर अजित पवार यांना विचारले असता, एकनाथ शिंदे हे अजिबात नाराज नाहीत, हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे अजित पवार म्हणाले. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत किंवा इतरही बैठकांत आम्ही तिघेही शेजारी बसतो. त्यावेळी ते नाराज असल्याचे अजिबात जाणवत नाहीत. लोकाभिमुख कारभार व्हावा, यासाठी आमचा तिघांचाही प्रयत्न असतो असे सांगत आमच्या तिघांचेही व्यवस्थित सुरू आहे, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली.
पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धावर अजित पवार म्हणाले...
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आंदेकरांच्या कुटुंबातील सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत याकडे लक्ष वेधले असता, पक्षात विकृती असावी, असे कुणाला वाटत नाही. पोलिसांनी राजकीय दबाव सहन न करता कारवाई करावी, अशी भूमिका आंदेकर प्रकरणावर अजित पवार यांनी मांडली.