मागणी आणि पुरवठ्या असमतोलामुळे टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत आहेत. हवामानातील बदल, पावसाचा फटका आणि नाशवंत पिक असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसात नारायणगाव व इतर भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाल्याने टोमॅटोचे दर कोसळले. पावसाचा फटका बसला असला तरी आवक भरभरून होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
Lemon Rate: पितृपक्षात लिंबाचा आंबटपणा वाढणार? एका लिंबाची किंमत 10 ते 20 रुपये होण्याची शक्यता
ठाणे मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो हे नाशवंत पीक असल्याने भाव काहीही असला तरी शेतकऱ्यांना माल बाजारात आणणे भागच असते. सध्या बाजारात कमी दर्जाचे टोमॅटो 20 ते 30 रुपये किलो तर चांगल्या दर्जाचे टोमॅटो 40 ते 50 रुपये किलो या दराने उपलब्ध आहेत. होलसेल बाजारात दर्जेदार टोमॅटोचा दर प्रतिजाळी 1000 रुपये असून त्यात 28 किलो टोमॅटो मिळतात. तर कमी दर्जाच्या टोमॅटोची जाळी 500 रुपयांना मिळत आहे.
टोमॅटोचे दर कमी झाल्याने ग्राहक सुखावला असला तरी शेतकऱ्यांना मात्र तोटा सहन करावा लागत आहे. टोमॅटो लागवडीपासून ते मजुरी, औषधं, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे. शिवाय, दरातील अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडतात. अनेकदा त्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसतो, असं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे.