बुधवारचा संपूर्ण दिवस गणेशोत्सवाबरोबरच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने गाजला. सुरुवातीला जरांगे पाटील यांना तितकेसे समर्थन मिळणार नाही, असा कयास अनेकांनी लावला होता. मात्र अनेकांचे अंदाज फोल ठरवून पहिल्यापेक्षा अधिक गर्दी घेऊन सरकारच्या दारात उपोषणासाठी जरांगे पाटील सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाचा सण मुंबईसह राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गणेशोत्सवात मुंबई शहर आणि उपनगरांत मोठी गर्दी होते. याच काळात जर जरांगे पाटील उपोषणासाठी मुंबईत आले तर वाहतुकीसह इतरही प्रश्न उभे ठाकतील, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने आपले शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याकरिता पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
फडणवीसांचे दोन मंत्री किल्ले शिवनेरीकडे!
मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम (आज) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असणार आहे. याच मुक्कामाच्या ठिकाणी राज्य शासनाचे मंत्री उदय सामंत आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांची भेट घेतील. जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात दोन्ही मंत्री त्यांच्याशी चर्चा करतील. सामंत आणि विखे पाटलांची शिष्टाई यशस्वी होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कितीही उशीर झाला तरी रात्री चर्चेसाठी भेटू, जरांगेंकडून निरोप
राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना चर्चेसाठी निरोप देण्यात आला. त्यावर आपण चर्चेसाठी तयार असल्याचे जरांगे पाटील यांनी कळविले. कितीही उशीर झाला तरी आपण शिवनेरीच्या पायथ्याला भेटू, रात्री चर्चा करू, असे विखे आणि सामंत यांना सांगण्यात आल्याचे खुद्द जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील अद्यापपर्यंत शिवनेरीला पोहोचले नाहीत. काही किलोमीटरचे अंतर पार करायला त्यांना दोन-तीन तास लागत आहेत.
जरांगे पाटील यांची पहिली मागणी सरकारकडून मान्य
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवृत्त न्यायमुर्ती संपत शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येण्याची घोषणा करून त्यांच्या प्रवासाला सुरुवात होण्याच्या २४ तास आधी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाने फार मोठा फरक पडणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.