या भेटीनंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे - भाजप युतीच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र दिसले होते. त्यांनी कायमस्वरुपी एकत्र राहण्याचा निर्धार केला होता. मात्र बेस्टच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरे बंधुंची युती काहीशी कमकुवत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.
advertisement
असं असताना आता पडद्यामागं मोठी खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पुढच्या काही वेळात ते पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल होणार आहेत. एकीकडे भाजप मनसे यांची जवळीक वाढत असताना सामंत शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
उदय सामंत नेमकं कोणत्या कारणासाठी शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र मनसे आणि भाजप नेत्याच्या भेटीगाठी होत असताना उदय सामंत शरद पवारांच्या भेटीसाठी जात असल्याने या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.