लोकसभेला जे कमावलं होत, ते मविआने विधानसभेला गमावलं? फक्त सहा महिन्यांत हे कसं घडलं? यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत पराभव कशामुळे झाला? यावरही भाष्य केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावर परखड मत मांडलं आहे.
विधानसभेतील पराभवावर भाष्य़ करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आलंय. 'लाडकी बहीण' सारख्या आता फसव्या ठरलेल्या योजनेचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की, वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की, स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ 'आपल्याला जिंकायचंय' म्हणून सोडून दिले."
advertisement
विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. 'तू तू मैं मैं' झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही एक चूक होती. हीच चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ उरत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचं यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे, हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो 'मी'पणा आला तेव्हा पराभव झाला, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.