उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते युतीबाबत प्रचंड सकारात्मक आहेत. तर, दुसरीकडे मनसेकडून आमचे दोन वेळेस हात पोळले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने प्रस्ताव पाठवावा अशी भूमिका घेतली आहे.
advertisement
ठाकरे गट आणि मनसेमध्ये पहले आप पहले आपचा खेळ सुरू असताना दुसरीकडे राज्यातील जनतेचे ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष लागले. आता शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव आणि राज यांच्यात कौटुंबिक कार्यक्रमात भेट....
मागील काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसले होते. इतकंच नाही तर दोन्ही भावांमध्ये चांगला सुसंवादही झाला असल्याचे दिसून आले. यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील राज यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील दुरावा संपत चालला असल्याचे संकेत मिळू लागले होते.
उद्धव आणि राज यांच्यात कुठं झाली भेट?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात परदेशात भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे बंधूंमध्ये ही गुप्त भेट माध्यमांना चकवा देत परदेशात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत राजकीय वाटचालीबाबत, युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता मुंबईत होणारी चर्चा ही औपचारिकता असू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव यांनी दिले होते संकेत...
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केले. उद्धव यांनी म्हटले होते की, जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेकडून युतीच्या प्रस्तावाची मागणी होत आहे. त्यावर उद्धव यांनी आता आम्ही काही संदेश देणार नाही तर बातमी देऊ असे सूचक वक्तव्य उद्धव यांनी केले. या मुद्यावरून आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नसल्याचेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले होते.