राज ठाकरे यांनी शिवतीर्थ बंगल्यावर आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, हिंदीबाबतचा जीआर रद्द करण्यास भाग पाडलं, यासाठी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. सगळीकडून जनमताचा, असंतोषाचा रेटा आला, त्याचा परिणाम झाला. साहित्यिक, मोजके कलावंत यांचेही आभार मानतो. त्यांनीदेखील या मुद्यावर आपला आवाज उठवला.
advertisement
हा मुद्दा श्रेयवादाचा नाही, मनसेकडून सरकारच्या आदेशावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यावरून तीन पत्रे दिली होती. आता, सरकारने आदेश रद्द केला आहे. सरकार पुन्हा अशा भानगडीत जाणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. सरकारला या भानगडीत पडण्याची गरज नव्हती. सरकारने समिती नेमावी वगैरे पण पुन्हा अशा निर्णयांची गरज नाही असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे बंधू एकत्र दिसणार...
5 जुलैचा मोर्चा रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी, उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै जल्लोष सभा होणार असल्याचे सांगितले. मनसेसोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी म्हटले की, संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाली आहे. 5 जुलैचा मोर्चा रद्द झाला. आता, त्याऐवजी विजयी मेळावा घेण्याची सूचना त्यांनी मांडली. त्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे. मात्र, ठिकाण आणि वेळ जाहीर न करण्याबाबत त्यांना सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वेळ आणि ठिकाण निश्चित करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी म्हटले की, सरकारविरोधात सगळेजण एकवटले होते. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. मराठीसाठी सगळे एकत्र आले होते. 5 जुलै रोजीचा विजयी मेळावा देखील राजकारणाच्या पलिकडे पाहिला हवा असेही राज ठाकरे यांनी म्हटले.