शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाला उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली. या मुलाखतीचा दुसरा भाग जाहीर झाला. या मुलाखतीत देशाच्या राजकारणासोबत उद्धव यांनी मराठी-हिंदी वाद, मनसेसोबतच्या युतीबाबत भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले की, महाराष्ट्र, मराठी, महाराष्ट्र धर्म... त्यात परत सांगतो, याचा अर्थ कोणत्याही राज्याचा अथवा भाषेचा द्वेष नक्कीच नाही, असे म्हटले. मुंबईत अनेक भाषिक राहतात. मी मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात त्यांना वेगळी वागणूक दिली होती का? मी हिंदुत्ववादी आहेच, पण म्हणून मी मुसलमानांना वेगळं वागवलं होतं? सावत्र वागणूक दिली होती? असा उलट सवाल त्यांनी केला.
advertisement
राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा...
उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या, मराठी माणसाच्या लढ्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भातसुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मला तेच कळत नाही की, मी जर थेट चर्चा केली तर कुणाला काय अडचण आहे? असं उलट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मी आतासुद्धा फोन उचलून राज यांना फोन करू शकतो. ते देखील मला फोन करू शकतात. आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय आहे? बाकीचे लोक एकमेकांना चोरूनमारून भेटतात. आम्ही चोरूनमारून भेटणाऱ्यातले नाहीत. ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केले.
राज ठाकरेंसोबत युती, मग मविआचं काय?
उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती झाल्यास महाविकास आघाडी राहिल का, या प्रश्नावरही उत्तर दिले आहे. आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जिंकण्याच्या उद्देशाने लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मध्यंतरी काँग्रेससोबत बोलणं झालं होतं. त्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार असल्याचे म्हटले. त्यावर आपणही तसं असेल तर तसं करू असे म्हटले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव यांनी म्हटले की, मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे, असेही त्यांनी म्हटले.
मविआ स्वतंत्र लढणार?
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचे भाष्य केले होते. महाविकास आघाडी ही राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांनी म्हटले होते. काँग्रेसच्या गोटातूनही मनसेसोबत उद्धव यांनी युती केल्यास स्वतंत्र निवडणूक लढवली जाण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मविआ काही ठिकाणीच अस्तित्वात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.