घोसाळकरांच्या नाराजीच्या चर्चा...
तेजस्वी घोसाळकर यांनी काही महिन्यापूर्वीच पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर तेजस्वी या शिंदे गट अथवा भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तर, दुसरीकडे माझ्या सूनेवर आणि माझ्यावर शिवसेना ठाकरे गट सोडून जाण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी म्हटले होते. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीच गरम झाले होते. त्यातच भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
advertisement
मात्र दोन दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, आणि आपण पक्षातच कार्यरत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर त्यांच्या नेमणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही नियुक्ती केवळ ठाकरे गटाच्या संघटनात्मक बळकटीकरणाचा एक भाग मानली जात आहे.
तेजस्वी घोसाळकरांवर कोणती जबाबदारी?
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दहिसर विधानसभा हा ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या ठिकाणी मराठी मतदार चांगल्या संख्येने आहे. त्याशिवाय, शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे.
विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गट पुन्हा संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांच्यासारख्या अनुभवी नेत्या आणि स्थानिक पातळीवर प्रभावी चेहऱ्याला जबाबदारी देणं, ही पक्षाची व्यूहात्मक खेळी मानली जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांचा स्थानिक पातळीवरील कामाचा अनुभव दहिसरमध्ये पक्षाला फायदा होईल, असे म्हटले जात आहे.
या घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत कुरबुरी शांत होण्याची शक्यता वर्तवली जात असून, भाजपकडून विरोधी गट फोडण्याचे प्रयत्न काहीअंशी अपयशी ठरल्याचंही या नेमणुकीतून स्पष्ट होतं असल्याची चर्चा आहे.