आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना नेते, विभागप्रमुखांसह मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास एक तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
advertisement
मनसेसोबत युतीवर चर्चा?
आजच्या बैठकीत मनसेसोबत युती करण्याच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, मनसेसोबत युती करण्यावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मनसेसोबत युती व्हावी, याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, आजच्या बैठकीत यावर चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंचे मिशन बीएमसी, पदाधिकाऱ्यांना कोणते आदेश?
मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पातळीवरील घडामोडींचा आढावा घेतला. आजच्या बैठकीत त्यांनी आपल्या विभागातील नागरिकांपर्यंत पोहचण्याचे आदेश दिले असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. मुंबईतील पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्या पार्श्वभूमीवर नालेसफाई आणि इतर कामे पूर्ण झाली का, याची पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याशिवाय लोकांशी संपर्कात राहण्याची सूचना करताना कोणाला काही अडचण आहे का बघा. डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले का, त्यांच्यासाठी उपचाराची व्यवस्था आहे का, हे पाहण्याचे आदेश दिले. त्याशिवाय, मतदार याद्या देखील तपासण्याचे आदेश त्यांनी दिले असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिले.