मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे देखील भाषण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्काच बसला आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी आता आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांची निवडणूक महत्त्वाची आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रस्त्यावरील आंदोलने सुरू असली निवडणुकीतील मोठं यश मिळत नाही. अशातच ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे?
ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झाल्यानंतर आता राज ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात हजर राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, या दसरा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या दसरा मेळाव्यातच राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. याच मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची जाहीर घोषणा होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, राज ठाकरे हे दसरा मेळाव्यात नसल्याने युतीची घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याआधीच भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेना आणि मनसे दोन राजकीय पक्ष असून त्यांचे काही मेळावे महत्त्वाचे आहेत. शिवसेनेसाठी दसरा मेळावा महत्त्वाचा असतो. तर, मनसेसाठी गुढी पाडवा मेळावा महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य केले होते.
ठाकरे गटाकडून तयारी सुरू...
दसरा मेळावा हा शिवसेनेचा परंपरागत आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दसरा मेळावा नेहमीच शिवसेनेसाठी ताकद दाखवण्याचे व्यासपीठ राहिले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दसरा मेळावा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागाने मुंबईत येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशातही हा दसरा मेळावा जोरदार यशस्वी करण्यासाठी ठाकरे गटाकडून तयारी करण्यात येत आहे.