दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत एक वेगळीच राजकीय रंगत अनुभवायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांचे स्वागत करताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली.
शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांना आपट्याची सोनं देत शुभेच्छा दिल्या. त्यांनी दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाला मिठाई वाटून सणाचा आनंद द्विगुणित केला. पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्याने शिवतीर्थावर आलेल्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यावेळी आम्हाला अशा स्वागताची अपेक्षा नव्हती, तुम्हाला भेटून आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी काही शिवसैनिकांनी व्यक्त केली. तर, शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांची विचारपूस केली.
advertisement
दरम्यान, दसरा मेळावा हा शिवसेनेच्या राजकारणातील परंपरा मानला जातो. मात्र, यंदा शिवसेनेच्या दोन्ही गटांचे (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे) वेगळे मेळावे पार पडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी झालेली ही घडामोड विशेष लक्षवेधी ठरली आहे. राज्यातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात सरकारविरोधात भूमिका घेताना आगामी निवडणुकीबाबत कोणतं भाष्य करणार आहेत, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.