ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी आज सकाळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विनोद घोसाळकर यांची सून आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. तेजस्वी घोसाळकर या भाजपात अथवा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आज घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
advertisement
घोसाळकरांनी केला गौप्यस्फोट...
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर विनोद घोसाळकर यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. आपल्या सून तेजस्वी घोसाळकर यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विनोद घोसाळकर म्हणाले, "माझ्या सुनबाईवर शिंदे गट आणि भाजपकडून दबाव आणला जात आहे. पक्ष प्रवेशासाठी आता काही दलाल निर्माण झाले आहेत. हे लोक ठाराविक कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की मी कुठेही जाणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि कायम शिवसेनेतच राहणार आहे."
आम्ही शिवसेनेतच, तेजस्वीकडून फक्त पदाचा राजीनामा
तेजस्वी घोसाळकर यांनी नाराजीतून स्थानिक पदाचा राजीनामा दिला. यावर स्पष्टीकरण देताना घोसाळकर म्हणाले, "तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. ती अजूनही शिवसेनेतच आहे. काही ठिकाणी यासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
घोसाळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आमच्या कुटुंबाबाबत समाजमाध्यमांवर आणि काही माध्यमांतून चुकीची माहिती पसरवली जात आहे. यामागे कोणाचा अजेंडा आहे, हे जनतेने ओळखावे, असेही त्यांनी सांगितले.