आधी मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर आले. मग वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवर बंधू भेट झाली. त्यानंतर गणपतीच्या साक्षीनं दोन ठाकरे बंधूंची भेट झाली. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा हा सिलसिला सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. आता या भेटीमागचं कारण उलगडण्याचा प्रयत्न केला जातोय.
advertisement
या भेटीची पहिली शक्यता म्हणजे दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी ही भेट आहे का अशी चर्चा सुरू झालीय. शिवसेना आणि दसरा मेळावा हे जणू समीकरणच आहे. याच मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर या मेळाव्याबाबत उत्सुकता आहे. या मेळाव्याबाबत शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे.
येणाऱ्या दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का, याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. मात्र,आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो,ही शक्यता नाकारता येत नाही, असं सचिन अहिर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. विशेष म्हणजे दोन ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळतेय.
भेटीचं दुसरं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील जागावाटपाची चर्चा?
आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात जागावाटपाबाबत या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. मुंबई मनपासोबत ठाणे, पुणे,नाशिकच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय.