मराठी माणसांसमोर आमच्यातले मतभेद क्षुल्लक आहेत, असे राज ठाकरे म्हटल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र आले. वरळीत झालेल्या सभेतच महापालिका निवडणुकाही एकत्र लढवू, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनासाठी राज ठाकरे मातोश्रीला गेले. पुन्हा गणेशोत्सवात उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले. दोन्ही नेत्यांमधला कौटुंबिक जिव्हाळा चर्चेत असताना वेळ आली होती राजकीय जवळीकतेची! महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना थेट चर्चा करून वाटाघाटीसाठी भेटणे गरजेचे होते. त्याचमुळे आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे कळते. परंतु आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, असे संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थ भेटीसाठी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे या कारणीभूत असल्याचे राऊत म्हणाले.
advertisement
बोलायला नीट जमलं नाही, उद्धव तू परत ये...
संजय राऊत म्हणाले, गणेशोत्सवात उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी अगदी थोड्या वेळ सहकुटुंब गप्पांना मिळाला होता, गर्दीही खूप होती. त्यामुळे उद्धव तू पुन्हा ये, आपल्याला बोलायला नीट जमले नाही, असे राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे त्यांना म्हणाल्या होत्या. काकी आणि मावशी-कुंदा ठाकरे यांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे यांनी आज भेट घेतल्याचे राऊत म्हणाले. आजच्या भेटीचे कारण मी सत्य सांगितले आहे. माध्यमांनी त्यावर विश्वास ठेवावा, असेही राऊतांनी आवर्जून सांगितले.
ठाकरे बंधूंमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा?
शिवसेना मनसेच्या राजकीय युतीच्या चर्चा, तोंडावर आलेला दसरा मेळावा, शिवाजी पार्क येथे होत असलेल्या शिवसेना मेळाव्यात राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती, अशा सगळ्या चर्चांवर बोलायला संजय राऊत यांनी नकार दिला. आजच्या भेटीत कोणत्याच राजकीय चर्चा झालेल्या नाहीत, यावर माध्यमांनी विश्वास ठेवावा. राज ठाकरे यांच्या मातोश्रींच्या आग्रहाखातरच उद्धव ठाकरे आले होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.