आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना भवन येथे मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहिले. शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर महिला शाखा प्रमुखांचीही बैठक ते घेणार आहेत.
>> विधानसभेतील ती चूक दुरुस्त करा...
advertisement
उद्धव ठाकरे यांनी आजच्या शाखाप्रमुखांच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करण्याची सूचना शाखा प्रमुखांना दिल्या. विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या फेरफारमुळे मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा मुद्या विरोधकांकडून मांडण्यात येतो. आता, ठाकरे यांनी या सगळ्या मतदार याद्या तपासण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. या मतदार याद्याच्या याद्यांची तपासणी करा, असे निर्देश त्यांनी दिले.
>> शाखाप्रमुखांच्या बैठकीत कोणते आदेश दिले?
> उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत शाखा प्रमुखांना महत्त्वाचे आदेश दिले. उपशाखाप्रमुख, गटनेत्यांनादेखील उद्धव यांनी महत्त्वाची जबाबदारी दिली.
> शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख, विधानसभा संघटक, महानगर प्रमुख यांनी आपआपल्या प्रभागातील बूथप्रमुख, वॉर्डप्रमुख, उपविभागप्रमुख, विभागप्रमुख यांची बैठका घेऊन तात्काळ कार्याला सुरुवात करण्याची सूचना उद्धव यांनी दिली.
> मतदार याद्यांतील किमान 300 घरातील मतदारांशी प्रत्येक शाखांनी आतापासून संपर्क ठेवावा व त्यांची पहिली जबाबदारी उपशाखा प्रमुखांनी घ्यावी, असे आदेश ठाकरे यांनी दिले. मतदार यादीची प्रत्येक गल्ली-मोहल्ल्यात जाऊन तपासणी करण्याची सूचना उद्धव यांनी दिली.
> शाखा प्रमुखांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून सामूहिकपणे काम करावे, अशी सूचना उद्धव यांनी केली.
> गट प्रमुखांनी नियमितपणे आपल्या गल्ली-मोहल्ल्यात पोहचावे आणि पक्षाचे काम सांगावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.
> मुंबईकरांना पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, वाहतूक आदी अनेक सोयी-सुविधा पुरविल्या. कोस्टल रोड सारख्या महत्वाच्या प्रकल्प आपल्या कारकिर्दीत मुंबईकरांसाठी दिल्या. आपण करुन दाखवलं पण, सत्ताधाऱ्यांनी सगळं गमावलं हे मतदारांच्या लक्षात आणून द्या, अशी सूचना ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येत्या निवडणुका ठाकरे गटासाठी अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सर्व पातळीवरील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात येत असून, पक्षाने निवडणुकीपूर्वी एकजूट दाखवण्यावर भर दिला आहे.
ठाकरेंसाठी शाखा प्रमुख ठरणार इम्पॅक्ट प्लेअर...
शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत शाखा प्रमुख हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. शाखाप्रमुख हे वॉर्डनिहाय असतात. त्याशिवाय, शाखाप्रमुखांचा स्थानिक पातळीवरील अनेक मुद्द्यात हस्तक्षेप असतो. स्थानिक जनतेमध्ये त्यांचा थेट संपर्क असतो. महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासाठी शाखाप्रमुखच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. मात्र, स्थानिक पातळीवरील बहुतांशी शाखाप्रमुख हे ठाकरेंसोबत राहिले. आता, याच संघटनात्मक आधारावर ठाकरे मुंबई महापालिकेचे मैदान मारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
इतर संबंधित बातमी:
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वर मोठी घडामोड! ठाकरेंचा तेजस्विनी घोसाळकरांना गो अहेड, पण...,