कल्याण-डोंबिवलीच्या तीन माजी नगरसेविकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकांच्या आधी या पक्षप्रवेशाने कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा गड अधिक भक्कम होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला.
ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम...
मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र आल्याने बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तसेच विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर होत असल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. परंतु याच निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा सुपडासाफ झाला. हाच धागा पकडून एकनाथ शिंदे म्हणाले, बेस्ट पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, आता काय म्हणणार? तरीही त्यांचा पराभव झाला. ते लोकसभा जिंकतात, त्यावेळी ईव्हीएमचा दोष नसतो, पण पराभव झाला की ईव्हीएमचा दोष असतो, निवडणुका हरल्या की निवडणूक आयोग दोषी असतो. आत्ताच्या निवडणुका तर बॅलेट पेपरवर झाल्या पण तरीही जनतेने त्यांना नाकारले. घरी बसणाऱ्यांना जनता नाकारते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करीत असते. कुणाला निवडून द्यायचं, कुणाला नाही, हे जनतेच्या हातात असतं.
advertisement
'खोडा' घालणाऱ्यांना जनतेने 'जोडा' दाखवला
मी मुख्यमंत्री असताना लोकाभिमुख निर्णय घेतले. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, ज्येष्ठांसाठी योजना सुरू केल्या. आत्ताही महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे. आम्ही सगळे टीम म्हणून काम करतोय, लोकांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे. महायुतीने केलेल्या कामांची पोचपावती जनतेने दिली आहे. विधानसभेला आमच्या २३२ जागा निवडून आल्या. आतापर्यंत आघाडी किंवा युतीच्या इतक्या जागा कधीही जिंकून आल्या नव्हत्या. त्यांनी आमच्या योजनेत खोडा घातला पण लाडक्या बहिणींना त्यांना जोडा दाखवला, जनता कामाची पोचपावती देते, असे शिंदे म्हणाले.