शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांवरच पूरभार या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल चढवला. काहीतरी गहाण टाकल्याशिवाय शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. त्याउलट हजारो कोटी रुपयांची कर्जहमी साखर कारखानदारांना मिळते. जसा कारखानदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तसा सर्वसामान्य जनतेनेही करावा काय? असा सवाल त्यांनी विचारला.
advertisement
जनतेला मदत करणे दूरच, सरकार जाहिरातबाजीत
महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट आहे. गेल्या आठवड्यात मी दौरा केला, मी प्रांजळपणे सरकारला विनंती केली की संकटात राजकारण न आणता मार्ग काढता येईल का , हे पाहू. परंतु मला सरकारची तशी तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त, दुसरे उपमुख्यमंत्री पाकिटावर जाहिरात करण्यात व्यस्त आहे. तिसरे उपमुख्यमंत्री तर अंगाला अजिबात लावूनच घेत नाहीत. त्यामुळे जनतेला मदत करणे दूरच आहे, असे ठाकरे म्हणाले.
सत्तेवर नसलात की ओला दुष्काळ असतो, सत्तेवर गेले की संज्ञा गायब, उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना खिंडीत गाठलं
सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे. याच पार्श्वभूमीवर तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले दुष्काळाबाबतचे पत्र उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवले. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी फडणवीस यांनी केली होती. ओल्या दुष्काळाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. हे पत्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवत पदानुसार संज्ञा बदलतात का? अशी विचारणा केली.
मुख्यमंत्री आणि दोन हाफ यांचा केवळ अभ्यास सुरू, मुजरे मारायला दिल्लीत जाता, आता लोकांसाठी दिल्लीत जा
राज्याचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना भेटून आलेत. मुख्यमंत्री आणि दोन हाफ उपमुख्यमंत्री यांचे प्रस्ताव बनवणे चालू आहे, त्यांचा अभ्यास सुरू आहे. केंद्राचे पथक अजूनही राज्यात आले नाही, पंचनामे कधी होणार, निर्दयीपणे सगळा कारभार सुरू आहे. ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा पण शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे, शब्दाचे खेळ करू नका. मुजरे मारायला दिल्लीत जाता, आता लोकांसाठी दिल्लीत जा, असे ठाकरे यांनी सुनावले.