मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई आदी नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
...त्या लोकांना तिकीट देणार नाही
मनसेच्या युती संदर्भात लवकरच निर्णय घेऊ, त्याचे संकेत दसरा मेळाव्यातून दिले जातील. गटप्रमुख आणि शाखाप्रमुख आपला जीव की प्राण आहेत. भाजपने आपला पक्ष आणि चिन्ह चोरले आहे. जे आपल्याला सोडून गेलेत आणि त्यांच्यातील काही लोक परत येतील, त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
advertisement
भाजपकडून काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका नाही, केवळ आपणच टार्गेट, महत्त्व समजून घ्या
भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस केवळ आपल्यावरच टीका का करतायेत हे लक्षात घ्या. भाजपकडून राष्ट्रवादीवर आणि काँग्रेसवर टीकेचा मारा होत नाही. त्यांना केवळ ठाकरेच दिसतायेत. ठाकरेंवर टीका याचे महत्त्व तुम्ही समजून घ्या. या निवडणुकीत विरोधकांना आपल्याला गाडायचे आहे. तुम्ही जोमाने कामाला लागा, असे आदेश ठाकरे यांनी दिले.
निवडणुकीला केवळ १०० दिवस उरलेत, जोमाने कामाला लागा
लोकांच्या संपर्कात राहा. दुबार मतदानावर लक्ष द्या. आपापसातील हेवेदावे विसरा. निवडणुकीला केवळ १०० दिवस उरले आहेत. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. प्रत्येकाने आपापली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडा. बाकी सर्व विषयांवर मी दसरा मेळाव्याला बोलेन, असे ठाकरे म्हणाले.