छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या रुपाने शिवसेना पक्ष पाच वेळा फुटला. पण ठाकरे कुटुंब म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक धक्का बसला तो राज ठाकरे यांच्या शिवसेनेतून जाण्याने... राज ठाकरे यांनी २७ नोव्हेंबर २००५ रोजी शिवसेना पक्ष सोडला. पुढच्या काही महिन्यांत महाराष्ट्र दौरा करून मार्च २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली. तेव्हापासून अगदी आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात प्रचंड संघर्ष होता. दरम्यानच्या काळात मनोमीलनाचे प्रयत्न झाले परंतु या ना त्या कारणाने समीकरणे फिस्कटली. मात्र मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशाविरोधात दोन ठाकरे बंधू एकत्र आले. एकत्र आलो ते कायम एकत्र राहण्यासाठी असा इरादा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.
advertisement
निवडणुकांच्या राजकारणात एकत्र येण्याआधी ठाकरे बंधू गणेशोत्सवाला एकत्र
शिवसेना फुटीनंतर पक्षाची झालेली नाजूक स्थिती तसेच राज ठाकरे यांच्या मनसेला देखील सातत्याने येणारे अपयश अशा राजकीय अपरिहार्यतेमुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आले, असे राजकीय जाणकार सांगतात. महापालिका निवडणुकांच्या अगदी तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्याचा निश्चित परिणाम मुंबई, पुणे, नाशिक आदी महानगरपालिकांत होईल, असे सांगितले जाते. तत्पूर्वी निवडणुकांच्या राजकारणात एकत्र येण्याआधी कुटुंब म्हणून ठाकरे बंधू अधिक जवळ येत आहेत. त्याचा पहिला मुहूर्त गणेशोत्सवाचा...
राज ठाकरे यांच्या घरी प्रथा परंपरेनुसार दरवर्षी गणपती बाप्पाचे आगमन होते. राज्यातील महत्त्वाचे नेते, पदाधिकाऱ्यांना गणपती दर्शनाचे निमंत्रण असते. यावर्षी उद्धव ठाकरे यांना गणपती दर्शनाचे निमंत्रण राज ठाकरे यांनी दिलेले आहे. भावाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून उद्धव ठाकरे हे बुधवारी सकाळी ११ वाजता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब जातील. गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतील. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही असतील.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी चार वेळा मातोश्रीचा उंबरठा ओलांडला. मात्र मागील दोन दशकांत उद्धव ठाकरे हे कधीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले नाहीत. बुधवारी पहिल्यांदाच ते राज ठाकरे यांच्या घरी जातील. त्यानिमित्ताने ते राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची कित्येक वर्षानंतर भेट घेतील. मधुवंती ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या काकू असण्याबरोबरच मावशी देखील आहेत.