खरं तर, गुन्हा घडल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे 7 दिवस फरार होते. त्यांनी पुण्यासह सातारा जिल्ह्यात आणि कर्नाटकच्या सीमेपर्यंत प्रवास केला होता. या प्रवासांत त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला होता. तसेच त्यांनी आपली लपवण्याची ठिकाणं देखील सातत्याने लपवली होती. दोघांना अटक केल्यानंतर आता ते कुठे होते, कोणाच्या मदतीने पळाले, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
राजेंद्र हगवणेला माजी मंत्र्याची मदत?
एका वृत्तसंकेतस्थळाला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हगवणे 19 ते 21 मे दरम्यान कोल्हापूरजवळील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ‘हेरिटेज रिसॉर्ट’मध्ये थांबले होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी त्यांची व्यवस्था कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. तसेच राजेंद्र हगवणेला लपवण्यासाठी स्वत: माजी मंत्री महोदयांनी तर मदत केली नाही ना? असा सवालही उपस्थित केला जातोय.
राजेंद्र हगवणे कुठे कुठे लपला?
मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह औंध रुग्णालयात पाहण्यासाठी हे दोघे इंडीवर कारने दाखल झाले होते. त्यावेळी अटकेची शक्यता लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बदलून थार गाडीने पळ काढला. त्यानंतर त्यांनी मुहूर्त लॉन्स, पवना डॅम जवळील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला. १८ मे रोजी थार गाडीनेच त्यांनी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला.
१९ मे रोजी आरोपींनी पुन्हा गाडी बदलली आणि बोलेरो गाडीने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पलायन केले. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला. २० मे रोजी पुसेगावहून ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये थांबले. २१ मे रोजी प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला आणि २२ मे रोजी ते पुन्हा पुण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांना अटक झाली.