नालासोपारा : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. दुपारी 2.30 वाजेपर्यंत महायुती 131 जागांवर तर महाविकास आघाडी 51 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप हा 131 जागांच्या आघाडीसह सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या या निकालात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे, यात बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचाही समावेश आहे.
advertisement
नालासोपारा मतदारसंघातून भाजपचे राजन नाईक यांचा विजय झाला आहे तर वसईतून स्नेहा दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांना धूळ चारली आहे. या विजयानंतर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयी उमेदवार राजन नाईक यांचं फोनकरून अभिनंदन केलं आहे. 'नालासोपारा विधानसभेतून भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना विजयाची विजयश्री खेचण्यासाठी लाडक्या बहिणी पदर खोचून अपप्रचाराच्या विरोधात उभ्या ठाकल्या आणि आपल्या लाडक्या भावासाठी विजयश्री खेचून आणली. हे श्रेय माझ्या कार्यकर्त्यांचे लाडक्या बहिणीचे आहे, असं म्हणत विनोद तावडेंनी राजन नाईक यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
हॉटेलमध्ये राडा
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी नालासोपाऱ्याच्या हॉटेलमध्ये मोठा राडा झाला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिकडे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि क्षीतिज ठाकूर शिरले आणि त्यांनी तावडेंवर पैसे वाटल्याचे आरोप केले. विनोद तावडेंनी वाटण्यासाठी 5 कोटी रुपये आणल्याचा आरोप क्षीतिज ठाकूर यांनी केला. यानंतर हॉटेलमध्ये जोरदार हंगामा झाला, अखेर हितेंद्र ठाकूर त्यांच्याच गाडीतून विनोद तावडेंना घेऊन गेले.
