बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्थनाचे बॅनर भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात काही समर्थकांकडून दाखवण्यात आले, त्याची मोठी चर्चाही झाली. त्यानंतर याच दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने वाल्मीक कराड याचा फोटो टाकून क्यूआर कोड टाकून दसरा मेळाव्याच्या चहापानासाठी तसेच अल्पोपहारासाठी पैसे गोळा करण्यात आले. तसेच हा क्यूआर कोड आणि मदतीचे आवाहन दोन दिवसांपासून फिरत होते.
advertisement
...तोपर्यंत आरोपीचे उद्दातीकरण, धनंजय देशमुख यांचे मत
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे. त्याची ओळख आणि खून प्रकरणातून त्याचे नाव पुसायला नको. तो पुसण्याचा त्याच्या समर्थकांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. जोपर्यंत संबंधित आरोपींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आरोपीचे उद्दातीकरण केले जाईल, असे धनंजय देशमुख म्हणाले.
वाल्मिक कराडच्या ब्रॅण्डिंगचे बॅनर बीड पोलिसांना दिसत नाही?
समाज माध्यमावर व्हायरल होणारे बॅनर आणि त्यावरील मजकूर खूप धक्कादायक आहे. तांदळे नामक गुंड आहे, त्यानेच हे बॅनर बनवले. त्याच तांदळे नामक नावाच्या गुंडाने मला, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्.या मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा फोटो टाकून आर्थिक सहाय्य मागत आहेत. त्यांना गुन्हेगारी संघटना मजबूत करायची आहे. त्यासाठी थेट बॅनरवर स्कॅनर लावून मदत मागितली जाते, हे पोलिसांना दिसत नाही का? पोलिसांनी तात्काळ आरोपींवर कारवाई केली पाहिजे. नाही तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असे विजयसिंह उर्फ बाळ बांगर म्हणाले.
ब्रॅण्डिंगसाठी क्राऊड फंडिंग?
समाज माध्यमावर व्हायरल होणारे बॅनर कधी बनवले आहे याविषयी संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. मात्र समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या बॅनरच्या माध्यमातून जेलमध्ये असलेल्या वाल्मीक कराडचे ब्रॅण्डिंग केले जात आहे का आणि त्यासाठी क्राऊड फंडिंग तर केले जात आहे का? असे विचारले जात आहे.
