परदेशात अजगर, कोब्रा यासारख्या विविध सापांची मोठी मागणी आहे. त्यामुळे या सापांची परदेशात तस्करी करणारे रॅकेट तर नाही ना... या दृष्टीने वनविभागाचा तपास सुरू आहे. वनविभागाने चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे काही तरुणांकडे मोठ्या संख्येने साप असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांनी कर्मचाऱ्यांसह आजनसरा गाठले. वनविभागाच्या चमूने संकेत लखपती पाठक (वय 25) रा. लावा, जिल्हा - नागपूर, शशिकांत रमेश बागडे (वय 35) रा. सुयोटोला, जि. गोंदिया, रुपेश दिलीप गुप्ता (वय 29) रा. कोहळे ले-आऊट, जिल्हा - नागपूर, स्वप्नील गजानन काळे (वय 30) रा. वाडी, जिल्हा - नागपूर यांना ताब्यात घेतले.
advertisement
त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केल्यावर मोठ्या संख्येने विषारी आणि बिनविषारी साप आढळले. या चारही व्यक्तींकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 कोबरा, 2 तस्कर, 3 धामण, 2 अजगर, 1 कुकरी, 1 पानदीवड, कवड्या प्रजातीचा 1 असे एकूण 13 साप व कार, साप पकडण्याची स्टीक, 25 किलो तांदुळ असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वनविभागाने चारही आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.