वर्धा : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. सध्या प्रेमाचा सप्ताह म्हणजेच व्हॅलेंटाईन विक सध्या सुरू आहे. त्यामुळे इतर सर्वसामान्यांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही प्रेम होतं का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्यामुळे इतर सर्वसामान्यांप्रमाणे तृतीयपंथीयांनाही प्रेम होतं का? आणि वर्धा येथील तृतीयपंथी अॅडव्होकेट शिवानी सुरकार यांच्या आयुष्यातला प्रियकर कोण? आताही त्या आठवणी जपतात का? याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
आम्हालाही सारख्या भावना -
शिवानी सुरकार या विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी अॅडव्होकेट आहेत. न्यूज18 लोकल सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, "ज्याप्रमाणे सर्व स्त्रियांना भावना असतात किंवा आकर्षण असतं तशाच भावना सर्व तृतीयपंथीयांनाही असतात. माझ्या आयुष्यातील प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर माझ्याही आयुष्यात मला कोणावर तरी प्रेम झालेलं. नागपूरमध्ये शिकत असताना वयाच्या 19 वर्षांची असताना महाविद्यालयाच्या प्राध्यापकाशी मला प्रेम झाले होते. आमची चांगली मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. पहिल्यांदा आम्ही रामदास पेठ येथील एका हॉटेलमध्ये भेटलो. त्यानंतर प्रेत्येक व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी आम्ही एखाद्या छान ठिकाणी सेलिब्रेट करायचो आणि एकमेकांना लाल गुलाबाचं फुल देऊन प्रेमभावना व्यक्त करायचो", असं त्यांनी सांगितले.
अन् असं झालं ब्रेकअप -
"2007 ते 2013 पर्यंत आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि आम्ही एकमेकांना खूप पसंत करायचो. मात्र, माझ्या सख्ख्या भावाचा आमच्या प्रेमाला विरोध होता त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तेव्हापासून आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही, बोललोच नाही. त्याच्याबद्दल मला आता माहिती नाही आणि माझ्याबद्दल त्याला माहित असेल का तेही मला माहिती नाही. तरीही त्यानंतर प्रत्येक व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मी त्याच्या फोटोला गुलाब फुल देऊन भावना व्यक्त करते," असं शिवानी सांगतात.
समाजाला दिला संदेश -
प्रत्येक तृतीयपंथीयांना स्त्रीसारख्याच भावना असतात. त्यामुळे समाजाने त्यांना स्वीकारून स्त्रीचा दर्जा आम्हाला द्यावा. तुमचं रक्त लाल आमचंही रक्त लाल, त्यामुळे आम्हालाही सारखा मान द्यावा. आजच्या तरुण पिढीने प्रेम करताना निस्वार्थ प्रेम करावे, एकमेकांना समजून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी न्यूज18 लोकल शी बोलताना व्यक्त केली. अॅडव्होकेट शिवानी यांना 19 वर्षांच्या असताना प्रेम झालं आणि आताही ब्रेकअप झालं असलं तरी वयाच्या 35 व्या वर्षीही व्हॅलेंटाइन डे या स्पेशल दिवशी त्या आपल्या प्रेमाच्या आठवणी जपताहेत. त्यामुळे प्रेम हे निस्वार्थ असावं, असा संदेश त्यांनी आजच्या तरुण पिढीला दिला आहे.