यवतमाळ : दिव्यांग म्हंटल की त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं. मात्र दिव्यांगत्व हे शरीराला आलेलं असतं, त्यामुळे अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वास भरला, त्यांना आधार दिला तर हे दिव्यांगत्व मानसिक पातळीवर जात नाही. जिद्दीच्या पंखांनी आकाश कवेत घेण्याचं स्वप्न डोळ्यात कोरून दिव्यांग व्यक्ती लढण्याचा प्रयत्न करतात. यवतमाळमधील शिरीन तबस्सुमची अशीच एक कहाणी आहे.
advertisement
यवतमाळ मधील इस्लामपुरामध्ये राहणाऱ्या शिरीन तबस्सुम वर जन्म मरणाच्या युगानुयुगाच्या खेळात नियती ऐन वेळेत तिच्यावर रुसली आणि जन्मापासूनच तिला दोन्ही हात आणि एक पाय द्यायला विसरली. असं असलं तरी काय झालं तर ती आज एकुलत्या एका पायाने सगळीच काम करू शकते. 11 वर्ष तिच्या आईने कडेवर घेऊन फिरवलं. तिच्या शाळेत प्रवेशासाठी तीच पुढे आली. 10 वी पर्यंत शिक्षण तिने अंजुमन शाळेत घेतलं. 11 वी 12 वी काटेबाई तर महिला अणे विद्यालयातून बी.ए ची पदवी पूर्ण केली. संगणकही तिला हाताळता येते. एम.एस.सी.आय.टी, टॅली यासारखे कोर्सेस तिने केलेत.
कौतुकास्पद! अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचे 52 Video, 'त्या' विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
कुटुंबाला हातभार लावण्याचा करते प्रयत्न
शिरीनला दोन्ही हात आणि एक पाय नाही तरीदेखील ती आपल्या एका पायाने सुबक अशी मेहंदी काढते. तिचं अक्षर देखील सुंदर आहे. तिला संगणकाचे उत्तर ज्ञान आहे. इतकच नाही तर 30 ते 34 विद्यार्थी तिच्याकडे कुराण शिकण्यासाठी येतात त्यातून मिळालेल्या पैशांनी ते आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करते आहे.
शिरीनचं हे होतं स्वप्न
शिरीन भविष्यात कलेक्टर बनण्याचे स्वप्न बघत होती. त्यासाठी तिने यूपीएससीचे क्लासेस देखील जॉईन केले. क्लासेससाठी तिचे वडील तिला गाडीवर घेऊन जायचे मात्र त्यानंतर वडिलांचा अपघात झाला आणि तिला क्लासेसला घेऊन जाण्यासाठी पर्याय मिळाला नाही. त्यानंतर तिचा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि ती घरीच ट्युशन क्लासेस घेऊ लागली, असं शिरीन सांगते. मला सरकारकडून नोकरी मिळावी अशी अपेक्षा आहे, सरकारकडून मला अजून तरी कुठलाच लाभ मिळालेला नाही, माझ्याकडे जी छोटी चाकांची गाडी आहे ती देखील माझ्या वडिलांनी स्वतःच्या मेहनतीतून माझ्यासाठी घेतली आहे, असंही शिरीनने सांगितले.
मनोरुग्णांना आधार देणारी संस्था, नवरा-बायकोने घालून दिला समाजसेवेचा अनोखा आदर्श
आत्मविश्वासाने शिरीन स्वावलंबी
शिरीनला तिच्या आई वडिलांनी मोठ्या कौशल्यानं तिला सांभाळलं. आपल्या मुलीनं कोणावर विसंबून राहू नये यासाठी त्यांनी तिला सगळीच कामे शिकवली. कॉलेजमध्ये असताना तिचे वडील तीला घ्यायला आणि सोडायला यायचे तिच्या मैत्रिणी तिच्याकडे मेंदी काढायला सुद्धा येतात. तिच्या आई वडिलांना वाटतं तिने कधीच कोणावर विसंबून राहू नये. म्हणून त्यांनी तिला गाडी सुद्धा चालवायला शिकवली. तिच्याजवळ हात नाही म्हणून ती परिस्थिती वर रडत बसली नाही तर एका पायाने ती सारं काही करू शकते. हा तिला आत्मविश्र्वास आहे आणि हेच वास्तव आहे.